व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडताना स्लॅब अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू
लाखांदूर :जीर्ण झालेले घर पाडण्याचे मजुरी काम मिळाल्याने अन्य एकाकडून व्हायब्रेटर मशीन किरायाने आणून मजुरीने घराचे स्लॅब पाडत असतांना स्लॅब व घराची भिंत अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनी येथे घडली. प्रफुल प्यारेलाल रामटेके (२५) रा विर्शी वार्ड हेटी वडसा जि गडचिरोली असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, स्थानिक सोनी येथील प्रियकांता गोपीचंद बावणे यांचे मालकी घर जीर्ण झाले आहे. पावसामुळे हे घर कधीही पडण्याची शक्यता असल्याने घर मालकाने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घर पाडण्याचे ठरविले.
दरम्यान, घरमालकाने व्हायब्रेटर मशीनच्या सहय्याने घर पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हेटी येथील प्रफुल प्यारेलाल रामटेके याला पाचारण केले होते. हाताला मिळेल ती मजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या प्रफुलला व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडण्याचे काम मिळाल्याने त्याने एका व्यावसायिकाकडून विद्युत वर चालणारी घर पाडण्याची व्हायब्रेटर मशीन किरायाने आणली होती. सोबतच प्रफुलने मदतनीस म्हणून एकाला कामावर ठेवले होते.
घटनेच्या वेळी व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडत असताना मदतनीस युवक काही कामानिमित्त बाहेर गेला. मदतनीस बाहेर गेला असताना देखील प्रफुलने इलेक्ट्रिक व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घराचे छत पाडण्याचे काम सुरू ठेवले. मात्र घर जीर्ण झाले असल्याने घराची स्लॅब व भिंत प्रफुलच्या अंगावर पडून प्रफुलचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूर ते ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे, पोलीस नायक संदिप बावनकुळे, पोलीस अंंमलदार राहुल कोटांगले यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. लाखांदूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे.
या घटनेची माहिती स्थानिक सोनी येथील तलाठी आशिष खामनकर, ग्रामसेवक विलास मुंढे, कोतवाल मंगेश सुखदेवे व सरपंच कुंता शहारे यासह अन्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. अवघ्या २५ वर्षीय युवकाचा घराचे स्लॅब पाडत असतांना घराचे स्लॅब व भिंत अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना सोनी येथे पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.