लाडकी बहिण योजने संदर्भात माजी खा. सुनिल मेंढे यांच्या कार्यालयात मदत केंद्र
भंडारा :- महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि लाभार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने माजी खासदार सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मार्गदर्शन व मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.
महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावा या दृष्टीने प्रयत्न होण्यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे. योजनेसंदर्भातील निकष, आवश्यक कागदपत्र, शासकीय कार्यालयातून कागदपत्र गोळा करताना येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर लाभार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने केंद्र उभारण्यात आले आहे. सोबतच कागदपत्राची पूर्तता असलेल्या लाभार्थ्यांचे अर्जही भरून दिले जाणार आहेत. जनसंपर्क कार्यालयात उभारण्यात आलेल्या या व्यवस्थेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी त्यांना असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी संपर्क करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
दरम्यान हे केंद्र 1 जुलै पासून सुरू झाले असून महिलांनी माहिती जाणून घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येते. या योजनेच्या अटींमध्ये शासनाने पुन्हा शिथिलता आणल्याने अधिकाधिक लाभार्थी पात्र ठरावेत, असा प्रयत्न माजी खासदार जनसंपर्क कार्यालयाकडून केला जात आहे.