भंडारा/ गोंदिया – आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात बोलताना आदिवासी समाजाचे हिताला भारतीय जनता पक्षाने जोपासले असल्याचे महत्वपूर्ण विधान भंडारा पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केले. अर्जुनी मोरगाव व लाखनी तालुक्यात भंडारा-गोंदिया जिल्हा स्तरीय आदिवासी संमेलनात आदिवासी बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांना निवडून देण्याचे आवाहन सुद्धा केले.
पुढे बोलताना विजयकुमार गावित म्हणाले, समान नागरिक हक्क कायद्या आणायचे ठरल्यावर, आदिवासींचे आरक्षण समाप्त होईल अशा अफवा पसरविण्यात आल्या मात्र तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपायी यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी समाजाला आरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगून आदिवासी समाजाला हा कायदा लागू होणार नाही असे स्पष्ट सांगितले. आदिवासी समाजाला शिक्षण, स्वास्थ्य आणि विकासाची गरज असल्यामुळे वाजपाई सरकारने आरक्षणात वाढ सुद्धा केली होती, असे गावित यांनी सांगितले. त्यामुळे आदिवासी समाजाचे सर्वांगीण हित केवळ भारतीय जनता पक्षानेच जोपासले असल्याचे विधान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केले. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी आणि आदिवासी बांधवांनी एकत्रित येत चिंतन करावे, या हेतूने गोंदिया जिल्हा स्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनिल मेंढे यांना निवडून देण्याचे आवाहन विजयकुमार गावित यांनी केले.